शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

Kavita

बरेच दिवस एक कविता मनात घर करून होति. आज ती शब्दांची लयाची कसलीच तमा न बाळगता कागदावर उतरली.
(एका बस थांब्यावर दोन चवदा वर्षाच्या मुली आहेत. एक एकटी आहे. एक पालकांसोबत आहे.)

कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ? तुला दुनिये पासून झाकतात तर मला  उघड्यावर टाकतातकुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?  

पदर आला तेव्हापासन तुझ्या आईबापान तुला दुनिये पासन झाकलीतेव्हांच या भडव्यांनी मला बाजारात टाकली. तुझ्या पाठीवर हात फिरावरत तर माझ्या छातीवर हात टाकतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तू ज्यांना अंकल, काका, पप्पा म्हणते ना त्यांना आम्ही "मरद" म्हनतो. काळे बिद्रे, उघडे केसाळ, रोज माझ्या अंगाला झोंबतात. तुझ्या समोर सभ्य बनून राहतात, तुला मायेन वागवतात आनि मला रात्रभर जागवतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

सकाळ होता होता पोट कंबर दुखाया लागत, डोळ्यात पाणी वहाया लागतं. त्या टाइमला  तू गाड झोपलेली असते. तुझी माय तुझं पांघरून नीट करत असते.  मला आपले आपाच आसू पुसाया लागतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुला जशी माय हायेना तशी मला  हाये, तिचं नाव भाकर हाये. ती पोटात गेली कि उब मिळते, फार दिवस ताटातूट झाली कि रडू फुटते. तिच्याच साठी हे भडवे मला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुझ्या जवळ जशी बाहुली हायेना ना तशी मला पण मिळणार हाये. एक बाबा म्हनतो ती माझ्या पोटातून येणार हाये. तिला  काडून टाक असे सगळे सांगतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुझ जग रंगीन गुलाबी, माझं काळ शराबी. तुझ्या चेहऱ्यावर येनार  हसू काही वेगळच हाय. माझ्या चेहऱ्यावर ते कधी आलच नाय. लई वाटत मी पण तुझ्या जगात यावं, बाहुली बरोबर खेळावं, रात्री शांत निजाव. पण माझ्या कडून तुझ्या जगात येणार रस्ताच नाय. अश्या कश्या आयुष्यभर पुरनाऱ्या  बेड्या पायत टाकतात.


कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ? तुला दुनियेपासून झाकतात तर मला  उघड्यावर टाकतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?