काल एक फॉरवर्ड व्हिडिओ आला, जो सहसा मी बघत नाही, पण बहिणीने ग्रुप वर टाकला म्हणून सहज बघितला. त्यात एक "कीर्तनकार" बाई तावातावाने बोलत होती. तिच्या बोलण्याचा सारांश हा होता की, हिंदू धर्म बुडत आहे आणि त्याला बुडवण्यात मुख्य भूमिका ही बायांची आणि त्यांच्या तोकड्या कपडे घालणाऱ्या मुलींची आहे. आया मुलींना कूंक, टिकली, बांगड्या घालण्याची सक्ती करत नाहीत. आणि त्या हेही म्हणल्या की, ज्या पोरी तोकडे कपडे घालतात आणि त्या मुळे जर त्यांच्यावर बलात्कार होत असतील( आणि त्या मुळेच होतात ) तर त्या मुलींच्या कानाखाली मारली पाहिजे.
हे सगळं ऐकून मी सुन्न झालो. आणि हा व्हिडिओ एका स्त्री ने शेयर करावा याचे मला खूपच आश्चर्य वाटले. मुळात स्त्री चे चारित्र्य तिच्या कपड्यात शोधण्याची ही कुठली वृती? जिथे स्त्री पूर्ण कपड्यात असते तिथे बलात्कार होत नाही असे तिला म्हणायचे आहे का?
स्त्रीने शरीरभर कपडे घातले की समाज सुसंस्कृत होतो का? समाज म्हणजे फक्त स्त्री का? सगळे कायदे फक्त तिलाच का? हे कीर्तनकार कधी मुलांच्या नियमंबद्दल बोलताना आढळत नाहीत. तरुण मुलांनी संध्याकाळ झाली की घरी परतावे. जीन्स घालू नये, धोतर झब्बा घालावा, तिळा लावावा. असे कधी ऐकले आहे का?
मुळात बलात्कार हे अनादी काळापासून होत आहेत, जगातील सर्व भागात होत असतात, जगातील कुठलाही वर्ण, घर्म, आर्थिक स्थर, सामाजिक स्थर या पासून मुक्त नाही. अंगभर बुरखा घालून फिरणाऱ्या बाया पण या पासून सुरक्षित नाहीत.
समाजाच्या निर्मितीसाठी पशुरुपी मानवाने समाजातील सर्व स्थरांचे हक्क अबाधित राहावेत म्हणून सामाजिक नियमांची निर्मिती केली. पण तेव्हा पासून आज तागायत माणसातील पशू हा या ना त्या मार्गाने त्यावर हवी होतो आणि माणूस खून, बलात्कार असली कृत्य करतो. त्यासाठी त्यास पशू समान शिक्षा होणे अपेक्षित आहे.
माणसाचे मानवी करण करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत, एक शिक्षा आणि दुसरे शिक्षण. आणि या दोन्ही गोष्टी दोघांसाठी गरजेच्या आहेत, परूष आणि स्त्री. हे लक्षात घ्या जेव्हा बलात्कार होतो तेव्हा त्या पुरुषातील पशू हा त्याच्या मानवी मनावर हावी होतो. याचाच अर्थ समाज त्या पुरुषावर संस्कार करायला , आणि त्याच्या मनात शिक्षेची भीती निर्माण करायला कमी पडला आहे. त्या मुळे खऱ्या संस्काराची आणि शिक्षेची गरज त्या पुरुषाला आहे.
पितृसत्तात्मक समाजात नियम लिहिणारा पुरुषच असल्याने त्याने सहजच सर्व नियम चौकटी ह्या स्त्रियांसाठी बनवल्या. अग्नीपरिक्षा फक्त सिते साठी. बायकोला जुगारात हरणाऱ्या युधिष्ठीरास काय शिक्षा मिळाली? नवरा मेल्यावर बाई ने सती जायचे आणि पुरुषाने बायको मेल्यावर खुशाल दुसरे लग्न करायचे. आणि त्यावर कडी म्हणजे ती सती कशी आदर्श आहे, म्हणून तिची पूजा स्त्रियांनी करायची. चौदा वर्ष राम वनवासात राहूनही राज्य चाललं ना? मग अजून दोन वर्ष तेही का गेले नाही सीते बरोबर?
स्त्रियांना हे लक्षात आले पाहिजे की हे सगळे पौराणिक दाखले हे त्यांचे हक्क कमी करून त्यांना धर्माच्या नावाखाली गुलाम बनवण्याचे आहेत. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे.
प्रश्न विचारणारी स्त्री ही अधर्मी, घरा बाहेर पडणारी स्त्री ही अधर्मी, मनाप्रमाणे कपडे घालणारी स्त्री ही अधर्मी. त्या व्हिडिओ मधे त्या बाईने डोक्यावर पदर घेतला आहे का? माझा त्या बाईला प्रश्न आहे, जर तुझ्या दृष्टीने तोकडे कपडे घालणारी मुलगी जर धर्म बुडवत असेल, निर्लज्ज असेल तर तुझ्या आधीच्या पिढीच्या दृष्टीने तूही डोक्यावर पदर न घेऊन निर्लज्ज पणा करत आहेस. तुझा नवरा मेल्यावर तू सती जाणार आहेस का? नाही. का नाही? एके काळची आपली ती संस्कृती होती, मग आता तू ते नियम का पाळत नाहीस? कारण आपण त्या प्रथेची समीक्षा केली आणि ती प्रथा कालबाह्य वाटली,अन्याय कारक वाटली आणि ती आपण बंद केली. (इंग्रजांनी बंद केली)
आपल्या हिंदू धर्माचे हेच खरे वैशिष्ट्य आहे. आपण प्रश्न विचारू शकतो. आपण बदलू आणु शकतो. धर्मात उत्क्रांती झाली पाहिजे. होताच राहिली पाहिजे तरच तो काळाशी तर्कसंगत राहील. पण हे असले सनातनी लोक धर्माच्या नावा खाली आपल्याला मागे लोटू पाहतात. धर्माच्या मूळ विचारांपेक्षा त्यातील रूढी पंपरांना वर आपली पोळी शेकातात. स्त्रीला आम्ही सन्मान देऊ पण तिने आम्ही आखलेल्या चाकोरीतूनच चालावे, ही विचारसरणी स्त्रियांनी तरी खपून घेता कामा नये. तुझ्या डोळ्यात लालसा आहे तर अंगभर कपडे मी का घालू? इथे सुधारण्याची गरज तुला आहे मला नाही. हे ठासून सांगितलं पाहिजे.
कुठल्याही संस्कृतीचे मूळ हे.. एक मेकांवर प्रेम करणे, आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे हेच असते.
या पेक्षा जास्त काहीच नाही. पण कालांतराने त्या वर रूढी परंपरेची पुटे चढू लागतात. आपण नेहमी म्हणतो आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे..पण मुळात आपल्याला तो अभिमान त्या चढलेल्या पुटांबद्दल असतो. मूळ संसृतीचा अंश तर खोलवर आत झाकला गेला असतो. जागत कुठलीही संस्कृती परफेक्ट नाही. आपलीही नाही. तिला डोळस पणे बघून तिला सर्वसमावेशक, सर्वहितकारी बनवण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण मुळात पशू आहोत, मानव बनत राहण ही निरंतर प्रक्रिया आहे.
कुठलाही कट्टरतावाद चांगला नाही. तो समाजाला मागेच नेतो. धर्म कुठलही असो.."आपला धर्म संकटात आहे" असे म्हंटले की सगळा समाज आंधळ्या मेंढरा सारखा त्या आवई उठवणाऱ्यच्या मागे चालू लागतो. अर्थात यात फायदा त्या माणसाचाच असतो. कारण तो त्याचा धंदा असतो. जर तुम्ही या सनातनी लोकांचा कावा वेळीच ओळखला नाही तर तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल की स्वयंपाक घराचा उंबरा हीच तुमची वेस आहे.